प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निती टेलर हिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शकानेच तिच्याकडे अत्यंत घाणेरडी मागणी केली होती, ज्यामुळे तिने ही इंडस्ट्री कायमची सोडण्याचा निर्णय घेतला.
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या एका मुलाखतीत नितीने या घटनेचा सविस्तर खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ज्या दिग्दर्शकासोबत तिने पहिला चित्रपट केला होता, त्यानेच चित्रपट पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी तिला बोलावले. यावेळी त्याने थेट मागणी करत म्हटले की, 'यावेळी तुला माझ्यासोबत झोपावं लागेल.'
या धक्कादायक प्रकारानंतर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला सुरुवातीला समजलेच नाही. या प्रसंगानंतर नितीने तात्काळ फोन कट करून त्या दिग्दर्शकाचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर तिने थेट तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, 'कल्पना कर, तो म्हातारा माणूस असा बोलतोय.'
त्या दिग्दर्शकाने इतर अभिनेत्रींसोबतही असेच गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे नितीने मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली, 'मी त्याला इतर मुलींसोबत पाहिले होते, पण तो माझ्याबाबतही असा प्रयत्न करेल याचा मी विचारही केला नव्हता.' या अनपेक्षित घटनेमुळे गोंधळून गेल्याने तिने सुरुवातीला कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, त्यानंतर आपण कधीही चित्रपट करणार नाही, असा ठाम निर्णय तिने घेतला.
नितीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली होती. २०१२ मध्ये त्रिनाधा राव नकिना यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मेम वयसुकु वचम' या तेलुगू चित्रपटातून तिने पदार्पण केले होते आणि हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर तिने 'पेल्ली पुस्तकम' आणि २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लव्ह डॉट कॉम' या चित्रपटांमध्ये काम केले. तिने एकूण तीन तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी 'प्यार का बंधन' या हिंदी मालिकेतून नितीने टेलिव्हिजनवर एन्ट्री घेतली होती. २०१४ मध्ये आलेल्या ‘कैसी ये यारियाँ’ या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. ती अलीकडेच 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती, जिथे ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली पण जिंकू शकली नाही. याशिवाय ती शेवटची 'बडे अच्छे लगते हैं २' या मालिकेत झळकली होती.





