प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून महायुतीत जाणाऱ्या नेत्यांची मालिका सुरूच असून शिवसेना ठाकरे गटाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. नुकतेच ९ पैकी ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर, आता ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचाही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
आपला राजीनामा अचानक दिलेला नसून गेल्या काही महिन्यांपासून पक्षात आपली मुस्कटदाबी होत असल्याचा गंभीर आरोप दुबे यांनी केला आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून २०१९ पासून इमानदारीने काम केले. मात्र आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर आणि हिंदुत्वाच्या लाईनवर मला खुलेपणाने बोलता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पक्षातील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी 'कॉकरोज' असा शब्दप्रयोग केला. माझ्या या प्रवासाच्या डब्यात खूप कॉकरोज झाले आहेत, त्यामुळे मी हा डबा सोडत आहे. चांगली ट्रेन मिळाली तर नक्की पकडेन, असे ते म्हणाले. ध्रुव राठी किंवा शर्जिल हे आपले हिरो नसून स्मित मच्छार हे आपले हिरो असल्याचे सांगत, त्यांच्या समर्थनार्थ पक्षाने एकही पोस्ट न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे कॉकरोज पक्षाचे आदर्श कसे होऊ शकतात आणि पक्षाने काय करायचे ते हे ठरवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राजकारणातील वाढत्या कटुतेवर बोट ठेवताना त्यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या एकत्रित चहा पिण्याच्या आठवणींना उजाळा दिला. महागाईसारख्या मुद्द्यांवर बोलायला हवे, पण संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी मांडले. मतभेद असावेत पण व्यक्तिगत हल्ले नसावेत. मध्यंतरी आपल्याला पक्षातून काढल्याचे बनावट पत्र बाहेर आले होते, मात्र पक्षाने त्याचे साधे खंडनही केले नाही. स्वतःच त्याचे खंडन करावे लागल्याने तीव्र वेदना झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या पक्षाची विचारधारा कुठे गेली आहे, असा थेट प्रश्न दुबे यांनी नेतृत्वाला विचारला आहे. आपण अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही, मात्र आता कुठे गेलो तरी '५० खोके' असे बोलले जाईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. चांगली संधी मिळाल्यास नक्की विचार करू, असे स्पष्ट करत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत.






