अमरावती, 13 ऑक्टोबर: समृद्धी महामार्गावर एका धावत्या ट्रकला भीषण आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असून, आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की ट्रकमधील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
हा अपघात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. मिळालेल्या माहितीनुसार, फुलांची वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक महामार्गावरील चॅनेल क्रमांक १२७ जवळ पोहोचला, तेव्हा अचानक वाहनाचा टायर फुटला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच ट्रकमध्ये आग भडकली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करून अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. या भीषण दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.





