मुंबईकरांनो सावधान! तापमानाचा पारा ३८ अंशांच्या पुढे, हवामान विभागाचा उष्णतेचा इशारा

मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असून तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा

मुंबई, 12 ऑक्टोबर: ऑक्टोबर महिना सुरू असतानाच राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून मुंबईत उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा चक्क ३८.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर कुलाब्यामध्ये ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं उद्याही शहरात उष्ण आणि दमट वातावरण राहील, असा इशारा दिला असून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरवर्षी या दिवसांत थंडीची चाहूल लागते, मात्र यंदा अद्याप थंडीची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. यावर्षी पावसाळा कोरडा गेल्याने आणि बहुतांश भागात पाऊस न पडल्याने राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पाऊस न पडल्याने उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांना या वाढत्या तापमानाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या वाढत्या तापमानाचा फटका धरणांमधील पाणीसाठ्यालाही बसत आहे. कडक उन्हामुळे रोज लाखो लिटर पाण्याची वाफ होत आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या आणि जवळपास ३०,००० हेक्टरवर पाणलोट क्षेत्र पसरलेल्या उजनी धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय आहे. जसजसा उन्हाचा तडाखा वाढतो, तसतसे बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याचे प्रमाण रोज १२ लाख लिटरवरून १८ लाख लिटरपर्यंत जाते. त्यामुळे पाण्याचे वार्षिक नियोजन करताना प्रशासनाला या बाष्पीभवनाच्या आकड्याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.

पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात आधीच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, त्यातच आता तापमानाचा पारा ३७ अंशांपर्यंत गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हामुळे सर्व पिके करपून गेली असून, पावसाअभावी शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या