प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी नागरिकांना आता असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट' दिला आहे. उद्याही या भागात उष्ण व दमट हवामान कायम राहणार असल्याने, घराबाहेर पडताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी सुट्टीच्या दिवशी घराबाहेर गेलेल्या लोकांना उन्हाचे तीव्र चटके बसले. शुक्रवारसारखीच उष्णतेची लाट रविवारीही जाणवली. आज मुंबईचे तापमान ३८.२ अंश सेल्सिअसपर्यंत गेले, तर ठाण्यात ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय, सांताक्रूझ येथील हवामान केंद्रात कमाल तापमान ३८ अंश आणि कुलाबा येथे ३६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
वाढत्या उकाड्याबरोबरच मुंबईतील हवेचा दर्जाही घसरत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १०१ वर पोहोचला आहे. ही हवा 'मध्यम' श्रेणीत मोडत असली तरी, श्वसनाचे विकार असणाऱ्यांना आणि आजारी व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरातील विविध निरीक्षण केंद्रांवर हवेच्या गुणवत्तेची नोंद घेण्यात आली आहे. यात वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) सर्वाधिक ४२४ एक्यूआयची नोंद झाली आहे. याखालोखाल देवनारमध्ये १३७ तर माझगावमध्ये ११५ एक्यूआय होता. मालाडमध्ये ९५, बोरिवलीत ७९, कुलाब्यात ७५, भायखळामध्ये ७३ आणि घाटकोपरमध्ये ६७ एक्यूआय नोंदवला गेला. मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण, नवी मुंबई आणि ठाणे येथे अनुक्रमे ८२, ८० आणि ७४ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे.







