भदोही, 4 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील भदोही जिल्ह्याचे नाव बदलून आता ‘संत रविदास नगर भदोही’ असे करण्यात येणार आहे. भदोही येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘आता आपला भदोही जिल्हा हा संत रविदास नगर भदोही या नावाने ओळखला जाईल.’ या नामकरणाच्या घोषणेसोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तब्बल १,३४० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले.
संत रविदास नगर भदोहीचा पुढील विकास हा मिर्झापूर आणि वाराणसी सिल्क क्लस्टरच्या स्वरूपात केला जाणार असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांत देशातील अनेक शहरांची जुनी नावे बदलण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ तर अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण झाले आहे. शहरांची नावे बदलण्याच्या या निर्णयांमुळे अनेकदा वादही पाहायला मिळाले आहेत. काही नागरिकांनी या बदलांना विरोध केला, तर काहींनी याला पाठिंबा दिला आहे.







