मुंबई, 4 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्यासह ४०० ते ५०० अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये देशभरातील ‘जेन झी’ सहभागी झाले होते. पोलिसांनी या आंदोलनाला आधीच परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही हे आंदोलन पार पडल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१) (३) आणि कलम १३५ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुकही केले होते. ‘मुंबई पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांचे मी आभार मानतो, मुंबई पोलिसांकडून दिल्ली पोलिसांनी काहीतरी शिकायला पाहिजे,’ असे वक्तव्य दिपके यांनी केले होते.
पोलिसांचे कौतुक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला गेल्याने अभिजीत दिपके यांना मोठा धक्का बसला आहे. विनापरवानगी आंदोलन केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





