प्रतिनिधी, 3 ऑक्टोबर: फ्लायदुबईच्या विमानात को-पायलटने केलेल्या हल्ल्यात स्वत:चा जीव धोक्यात घालून १७० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचे जगभरातून कौतुक होत आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननेही (Shah Rukh Khan) त्यांच्या धाडसाला सलाम केला आहे.
शाहरुखने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत स्मित मच्छार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. “जेव्हा सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही ठामपणे उभे राहिलात. स्वतःला अशा परिस्थितीत मजबूत ठेवणं आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं सोपं नसतं. मात्र, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं आणि खऱ्या कॅप्टनचा अर्थ दाखवून दिला. हे धैर्य आणि कर्तव्याचं खरं दर्शन आहे. तुम्हाला लवकर बरं वाटावं अशी सदिच्छा व्यक्त करतो, भारताचा तुमच्यावर विश्वास आहे,” अशा शब्दांत शाहरुखने भावना व्यक्त केल्या.
३० सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानाने दुबईहून तेल अवीवच्या दिशेने उड्डाण केले होते. यावेळी विमानाच्या को-पायलटने स्मित मच्छार यांच्यावर अचानक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतही मच्छार यांनी अतुलनीय शौर्य दाखवत विमान क्रॅश होण्यापासून रोखले आणि कॉकपीटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवाशांच्या मदतीने विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आणि हल्लेखोर को-पायलटला पकडण्यात आले.
शाहरुख खानच्या आधी अभिनेता सलमान खान, परेश रावल, आर. माधवन, विजय देवरकोंडा आणि रवी किशन यांनीही स्मित यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. “कमाल केली पायलट जी. आम्ही सर्वजण तुम्हाला सलाम करतो. तुमच्यासोबत उड्डाण करणं आमच्यासाठी आनंदाची बाब असेल. छान काम केलं ब्रो, कॅप्टन स्मित मच्छार,” असे सलमानने म्हटले आहे.
दरम्यान, कॅप्टन स्मित मच्छार यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. अपघातानंतर त्यांच्यावर सुरुवातीला सौदी अरेबियातील तबूक येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अबुधाबीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याशी संवाद साधला असून, पूर्वीपेक्षा बरं वाटत असल्याचं स्मित यांनी पंतप्रधानांना सांगितलं आहे.







