पुणे, 14 नोव्हेंबर: मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा दरीत पडून दुर्दैवी अंत झाला आहे. वेळ वाचवण्यासाठी घेतलेल्या शॉर्टकटमुळे पाय घसरून हा तरुण तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
साहीद अन्सारी (वय २०) असे या घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बैकटपूर येथील रहिवासी होता व सध्या मुळशीतील ताथवडे भागात वास्तव्याला होता. साहीद त्याच्या चार मित्रांसोबत प्लस व्हॅली आणि मिल्कीबार धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेला होता.
निसर्गसौंदर्याचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागताना या मित्रांनी सुरक्षित आणि नेहमीच्या रस्त्यावरून जाणे टाळले. त्याऐवजी त्यांनी एका धोकादायक शॉर्टकटची निवड केली. या मार्गावर सुमारे ४५ अंशांचा तीव्र उतार होता. याच उतारावरून खाली उतरताना साहीदचा अचानक पाय घसरला, त्याचा तोल गेला आणि तो थेट २०० फूट खोल दरीत पडला.
तरुण दरीत कोसळल्याची माहिती मिळताच पौड पोलीस, रोहा रेस्क्यू टीम आणि एस.व्ही.आर.एस.एस. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या बचाव पथकांनी एकत्रितपणे 'रोप रेस्क्यू ऑपरेशन' राबवत साहीदचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना निसर्ग पर्यटनाला जाताना स्वतःच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- केस गळती रोखण्यासाठी जास्वंदाचे तेल गुणकारी; जाणून घ्या घरच्या घरी तेल बनवण्याची सोपी कृती
- ‘त्याने मैदानात बाटलीचं झाकण काढलं होतं’, पॅट कमिन्सकडून चेंडूशी छेडछाड पाहिल्याची कबुली
- १६ नोव्हेंबरला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातावरून यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेरील पोस्टरने खळबळ




