१६ नोव्हेंबरला राजकीय बॉम्ब फुटणार? अजितदादांच्या अपघातावरून यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेरील पोस्टरने खळबळ

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मफलरवाल्या नेत्यावर निशाणा साधणाऱ्या एका रहस्यमय पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

mahasatta

मुंबई, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान मुंबईत एका रहस्यमय पोस्टरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर लावण्यात आलेल्या या पोस्टरवर 'अजितदादांच्या अपघात आणि घातपातामागे असणाऱ्यांना पाठीशी घालणारा मफलरवाला नेता कोण?' असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

या पोस्टरवर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचा दावा यात केला असून, या अपघातामागील मुख्य सूत्रधारांना वाचवणारा नेता नेमका कोण, अशी विचारणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये एका मफलरचे चित्रही छापण्यात आले आहे. या चित्रामुळे एका विशिष्ट नेत्याकडे बोट दाखवले जात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या रहस्यमय पोस्टरमागे नेमके कोणाचे डोके आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

येत्या १६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता कोणता 'राजकीय बॉम्ब' फुटणार, असाही उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. त्यामुळे १६ तारखेला कोण पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत नवीन खुलासे करणार आणि मफलरवाल्या नेत्याचे रहस्य उलगडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या