‘द डर्टी पिक्चर २’ ची एकता कपूरकडून घोषणा, ‘सिल्क’च्या भूमिकेत विद्या बालन की नवी अभिनेत्री?

एकता कपूरने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर ‘द डर्टी पिक्चर २’ बनवण्याची घोषणा केली असून, चित्रपटाच्या नव्या स्टारकास्टबाबत चर्चांना उधाण आले आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: 'द डर्टी पिक्चर' या सुपरहिट चित्रपटाला १५ वर्षे झाल्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीव्ही क्वीन आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने 'द डर्टी पिक्चर २' ची योजना आखत असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे या सिक्वेलमध्ये पुन्हा विद्या बालन दिसणार की अन्य कोणती अभिनेत्री तिची जागा घेणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नुकतीच एकता कपूरने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. यावेळी आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना तिने हा खुलासा केला. एकताने स्पष्ट केले की, "मी सध्या ज्या मोठ्या चित्रपटाची तयारी करत आहे तो म्हणजे ‘द डर्टी पिक्चर’, ज्याचा पहिला भाग १५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता मी ‘द डर्टी पिक्चर २’ ची योजना आखत आहे, ज्यासाठी माझ्याकडे एक अतिशय रंजक सिक्वेल कथा असून ती मला प्रेक्षकांसमोर आणायची आहे."

एकता कपूरच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पहिल्या भागात विद्या बालनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. मात्र, या दुसऱ्या भागात पूर्वीचेच कलाकार असतील की नाही, याविषयी एकताने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सिक्वेलमध्ये विद्या बालनच्या जागी एखादी नवी अभिनेत्री काम करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित 'द डर्टी पिक्चर' हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. मिलन लुथरिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विद्या बालनसोबत नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी आणि तुषार कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ८० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती, तर जगभरातील गल्ला सुमारे ११७ कोटी रुपये होता. व्यावसायिकदृष्ट्या हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या