आई शाळेत उशिरा आली अन् तो क्रिकेटपटू बनला; रणजीमध्ये ९ बळी घेणाऱ्या तनय त्यागराजनची रंजक कहाणी

आई शाळेत घ्यायला उशिरा आल्यामुळे क्रिकेटकडे वळलेल्या तनय त्यागराजनने रणजी ट्रॉफीमध्ये ९ बळी घेत हैद्राबादला त्रिपुरावर दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: हैद्राबादचा लेफ्ट आर्म स्पिनर तनय त्यागराजन याने नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यात ९ बळी घेत आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. मात्र, ३० वर्षीय तनयचा क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास अत्यंत रंजक आणि योगायोगाचा आहे. शाळेत असताना त्याची आई त्याला घ्यायला उशिरा आली, तेव्हा शाळेच्या कोचने त्याला वेळ घालवण्यासाठी गोलंदाजी करायला सांगितली आणि तिथूनच त्याच्या क्रिकेट प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

रणजी ट्रॉफीच्या २०२६-२०२७ हंगामातील हैद्राबादचा हा पहिलाच विजय ठरला आहे. या सामन्यात हैद्राबादने त्रिपुरावर एका डावाने आणि ४० धावांनी मात केली. त्रिपुराचा पहिला डाव १३४ तर दुसरा डाव केवळ १२० धावांत आटोपला. याउलट हैद्राबादने पहिल्या डावात २९४ धावांचा डोंगर उभा केला होता. या विजयामुळे हैद्राबादला ७ गुण मिळाले असून, हंगामात डावाने विजय नोंदवणारा तो पहिला संघ ठरला आहे. या पहिल्यावहिल्या विजयाचे प्रमुख श्रेय हिरो ठरलेल्या तनय त्यागराजनला जाते.

तनय ८ वर्षांचा असताना कोलकात्यामध्ये शिकत होता. आईची वाट पाहत असताना त्याने केलेली अफलातून गोलंदाजी पाहून शाळेचे प्रशिक्षक चांगलेच प्रभावित झाले. त्यांच्या प्रोत्साहनानेच तनय क्रिकेटकडे वळला. पुढे २००७ मध्ये त्याच्या वडिलांची कोलकात्याहून हैद्राबादला बदली झाली. तिथे मेंटॉर अभिजीत चटर्जी आणि प्रशिक्षक अदनान बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या गोलंदाजीवर कसून मेहनत घेतली.

२०१७ मध्ये लिस्ट ए, तर २०१८-१९ च्या हंगामात तनयने रणजी करंडकात पदार्पण केले. पहिल्याच रणजी हंगामात त्याने पाच सामन्यांत १७ विकेट्स घेतले. त्यानंतर २०२३-२४ च्या हंगामात त्याने ७ सामन्यांत ५६ बळी टिपले, ज्यात सात वेळा 'फाइव्ह विकेट हॉल'चा समावेश होता. तनयने आतापर्यंत ३७ फर्स्ट क्लास सामने खेळले असून एकूण १७० बळी घेतले आहेत. यात त्याने १२ वेळा पाच विकेट्स आणि दोन वेळा दहा विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.

या दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्सने त्याला २० लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले होते. आयपीएलमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे तो पुन्हा रणजीकडे वळला. आता या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या