‘जेलर २’साठी मिथुन चक्रवर्तींनी रजनीकांत यांच्यासमोर ठेवली मोठी अट; म्हणाले, ‘ना मला मारायचं, ना…’

‘जेलर २’ चित्रपटात खलनायकाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रजनीकांत यांच्यासमोर एक मजेशीर अट ठेवली होती, ज्याचा खुलासा खुद्द रजनीकांत यांनीच केला.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर २' या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या भूमिकेला होकार देण्यापूर्वी मिथुन यांनी रजनीकांत यांच्यासमोर एक मोठी अट ठेवली होती. खुद्द रजनीकांत यांनीच 'जेलर २' च्या एका विशेष कार्यक्रमात या गमतीदार किस्स्याचा खुलासा केला आहे.

जेव्हा चित्रपटाच्या निर्मिती टीमने मिथुन चक्रवर्ती यांना खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला नव्हता. रजनीकांत यांच्यासारख्या सुपरस्टारसमोर खलनायक म्हणून काम करताना आपल्याला मार खावा लागेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आपण रजनीकांत यांचे चांगले मित्र असल्याचा संदर्भ देत त्यांनी मिश्किलपणे विचारले होते की, “मी खलनायकाची भूमिका करणार आणि रजनीकांत यांच्याकडून मार खाणार? मग मी हा चित्रपट का करू?”

त्यानंतर एका कार्यक्रमात या दोन्ही दिग्गज कलाकारांची भेट झाली आणि पुन्हा या चित्रपटाबाबत चर्चा रंगली. तेव्हा मिथुन यांनी रजनीकांत यांना स्पष्ट सांगितले की, तुमच्या शब्दाखातर मी चित्रपटात काम करण्यास तयार आहे, पण त्यासाठी एक अट मान्य करावी लागेल. “तुम्ही मला मारायचं नाही आणि माझ्यावर गोळीही झाडायची नाही!”, अशी अट मिथुन यांनी घातली. त्यांच्या या मागणीवर आपण दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्याशी चर्चा करून निर्णय कळवू, असे रजनीकांत यांनी त्यांना सांगितले. मिथुन त्यावेळी केवळ मस्करी करत असावेत, असे आपल्याला वाटल्याचेही रजनीकांत यांनी नमूद केले.

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भ्रष्टाचार' या चित्रपटानंतर आता अनेक वर्षांनी रजनीकांत आणि मिथुन चक्रवर्ती रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहेत. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर २' मध्ये या दोघांसोबतच मोहनलाल, विद्या बालन, एस. जे. सूर्या आणि रम्या कृष्णन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच शिवराजकुमार आणि जॅकी श्रॉफ हे विशेष भूमिकेत झळकणार आहेत.

२०२३ मध्ये आलेल्या 'जेलर' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता दमदार स्टारकास्ट, ॲक्शन आणि विनोदाची जोड असलेल्या या सीक्वेलकडून चाहत्यांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या