प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मराठीतील 'छम छम करता…' या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, एवढ्या मोठ्या अभिनेत्रीने हे गाणे का स्वीकारले, याचे खरे कारण तिने नुकतेच उघड केले आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी तिने कोणतेही मानधन घेतले नव्हते.
या गाण्याच्या आठवणींना उजाळा देताना सोनालीने सांगितले की, तिला या गाण्यासाठी फोन आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम नवीन असल्याने, तिच्या सहभागामुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक प्रकारचा 'बूस्ट' मिळेल, असे तिला सांगण्यात आले. केवळ मराठी सिनेसृष्टीला हातभार लावण्यासाठी आपण हे गाणे विनामोबदला केल्याचे तिने स्पष्ट केले.
'छम छम…' गाण्यामुळे सोनालीची मराठीत मोठी चर्चा झाली असली, तरी तिचा हा पहिला मराठी प्रोजेक्ट नव्हता. तिने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी तिने 'अनाहत' नावाच्या एका मराठी चित्रपटातही काम केले होते. तो व्यावसायिक चित्रपट नसला, तरी तो आपला पहिला मराठी चित्रपट असल्याचे ती म्हणाली.
दरम्यान, सोनाली नुकतीच 'कोण होणार करोडपती' या मराठी शोमध्ये सहभागी झाली होती. माधुरी दीक्षित होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात सोनालीने तिचा कॅन्सरचा आजार, त्यातून झालेली रिकव्हरी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही मनमोकळ्या गप्पा मारल्या.





