प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: अभिनेत्री सोनाली बेंद्रेने दमदार भूमिका साकारत एकेकाळी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. तिच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले, मात्र जेव्हा तिला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान झाले, तेव्हा तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. या आजारावर तिने खंबीरपणे मात केली असून, नुकतेच तिने या कठीण प्रवासाबद्दल एक लक्षवेधी वक्तव्य केले आहे.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सोनालीने तिच्या आजारपणाच्या काळातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. अभिनेत्री माधुरी दीक्षितने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने कॅन्सरकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सांगितला. कॅन्सरवर मात केल्यानंतर दिसणाऱ्या तिच्या खंबीर रूपाबद्दल माधुरीने तिला विचारले होते.
यावर उत्तर देताना सोनाली म्हणाली की, जेव्हा आपण कॅन्सरवर मात केली असे म्हणतो, तेव्हा त्यात एक प्रकारची नकारात्मकता आणि भांडणाची भावना जाणवते. आपला हेतू या आजाराशी लढण्याचा नसून, तो समजून घेण्याचा आणि त्यातून शिकण्याचा होता. 'कॅन्सरच्या पेशी या आपल्याच शरीराचा भाग आहेत, त्यामुळे स्वतःच्याच पेशींसोबत आपण कसे भांडणार?' असा विचार तिने त्यावेळी केला.
या विचारामुळे तिने स्वतःच्या शरीरावर, ते जसे आहे तसे प्रेम करण्याचा निर्णय घेतला. 'ज्या गोष्टीमुळे आपल्याला खूप त्रास होत आहे, त्यावर प्रेम करणे अत्यंत कठीण असते,' असे सोनाली म्हणाली. मात्र याच सकारात्मक दृष्टिकोनामुळे तिचे काम सोपे झाले आणि पुढील प्रवास सुकर झाल्याचे तिने स्पष्ट केले. सोनाली सध्या बॉलिवूडमध्ये पूर्वीसारखी सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावरून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.





