प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याचे वडील आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्यासोबतचे काही भावनिक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त वडिलांसोबतच्या या खास फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, वडिलांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करणाऱ्या चाहत्यांसाठी ही पोस्ट विशेष ठरत आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये दोघेही डोक्यावर हॅट परिधान करून खास अंदाजात पोझ देताना दिसत आहेत. दुसऱ्या एका छायाचित्रात सलमान वडिलांसमोर बसलेला असून त्याने सलीम खान यांचे दोन्ही हात प्रेमाने आपल्या हातात धरले आहेत. बाप-लेकामधील हा जिव्हाळा पाहून चाहते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत असून, अनेकांनी कमेंट्स करत सलीम खान यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
या फोटोंसोबत सलमानने दिलेले कॅप्शन सध्या जोरदार चर्चेत आहे. सलमानने लिहिले, 'कसा आहेस पार्टनर? वयाच्या 91 व्या वर्षीही एक नंबरचा जलवा. बाप हा बापच असतो, तो खरा मॉनस्टर आहे. आपल्या सर्वांच्या बापात आहे दम. वंदे मातरम्! एक दिवस अधिक मिळत नाही, तर आयुष्यातला एक दिवस कमी होत असतो. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय? देवाची कृपा आहे.' या शब्दांतून सलमानने वडिलांना 'रिअल मॉन्स्टर' म्हणत त्यांचा गौरव केला आहे तसेच 'बाप बाप होता है' म्हणत त्यांची ताकद अधोरेखित केली आहे.
सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत या वर्षीच्या सुरुवातीला मोठी चिंता निर्माण झाली होती. 17 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना सौम्य स्वरूपाचा ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती दिली होती आणि त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवून वैद्यकीय उपचार करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आणि मार्च महिन्यात ईदच्या दिवशी त्यांनी कुटुंबीयांसोबत चाहत्यांना अभिवादनही केले होते. आता सलमानने शेअर केलेल्या या नव्या फोटोंना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.




