प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बहुचर्चित ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाचे पहिले दोन टप्पे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएकडून (MMRDA) यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग ४ हा पहिला टप्पा आणि ठाणे-बेलापूर या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम ऑगस्टच्या अखेरीसच १०० टक्के पूर्ण झाले आहे. सध्या या दोन्ही टप्प्यांवर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्गावरील नामफलक आणि दिशादर्शक फलक लावण्याची कामे सुरू असून ती आठवडाभरात पूर्ण केली जातील. त्यानंतर हे मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुले केले जाण्याची शक्यता आहे.
हे दोन्ही टप्पे सेवेत दाखल झाल्यानंतर ते मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा या भागांना जोडले जातील. यामुळे ऐरोली ते ठाणे-बेलापूर रस्ता असा प्रवास अतिजलद होणार असून वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होईल. या उन्नत मार्गामुळे डोंबिवली ते नवी मुंबई या प्रवासाच्या वेळेत ३० ते ४५ मिनिटांची बचत होणार असून, प्रवासाचे हे अंतर केवळ १५ मिनिटांवर येणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ ते काटई नाका असा हा ६.७१ किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा असेल. यामध्ये ३-३ मार्गिकांच्या मुख्य उड्डाणपुलासह (व्हायडक्ट) एका सेवा रस्त्याचा समावेश आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी वाहनधारकांना आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असून, हे काम ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करून हा मार्ग सेवेत दाखल होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.




