प्रतिनिधी, 30 ऑक्टोबर: विधान परिषदेच्या ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीने मिळवलेल्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास घाबरत असल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारेच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खडसे म्हणाल्या की, हे यश नेते, पदाधिकारी यांच्या मेहनतीचे आणि जनतेच्या विश्वासाचे फळ आहे. बॅलेट पेपरवरील प्रक्रियेवर आपला विश्वास असून त्यात महाविकास आघाडीला यश मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या महायुती सरकारवर नागरिक आणि विद्यार्थी तीव्र नाराज आहेत. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना सरकार पाठीशी घालत असून, रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच संतापाची प्रतिक्रिया पदवीधर मतदारांनी मतदानातून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सुरू असलेल्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती देताना त्यांनी ग्रामीण भागातील विदारक वास्तव मांडले. आर्थिक अडचणींमुळे केवळ मुलांचे शिक्षण सुरू ठेवून अनेक ठिकाणी मुलींचे शिक्षण मोठ्या प्रमाणावर थांबवले जात आहे. ही परिस्थिती अनेक पिढ्यांपासून चालत आली असून, आजही विविध जिल्ह्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण चिंताजनक आहे. या सर्व समस्या जाणून घेत त्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा दौरा काढण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.
राज्यातील महिलांच्या अत्यंत गंभीर प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. रोजंदारी बुडू नये आणि मासिक पाळीचा त्रास टाळण्यासाठी महिलांकडून थेट गर्भपिशवी काढली जाण्याचे प्रकार हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या. यापूर्वी ऊसतोड कामगार महिलांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि रोजगार बुडणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या कर्जवसुलीला शासनाने स्थगिती दिलेली आहे. असे असतानाही फायनान्स कंपन्या कर्जफेडीसाठी महिलांना त्रास देत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला. दबाव आणणाऱ्या कंपन्यांविरोधात महिलांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात. तसेच, असा कोणताही त्रास होत असल्यास पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, पक्ष निश्चितच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आवाहन त्यांनी केले.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवतोय? तुमच्या जीवनशैलीतील ‘या’ सवयी असू शकतात कारणीभूत
- आयपीएल २०२७: मुंबई इंडियन्सकडून रॉबिन उथप्पाची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून घोषणा
- सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची करडी नजर; तुकाराम मुंढेंचा इशारा, १९ कोटींचे मसाले जप्त




