नागपूर पदवीधर मतदारसंघातून नितेश कराळे मास्तर अपक्ष लढणार; मविआच्या अडचणी वाढणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे गुरुजी नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ५ ऑक्टोबरला ते अर्ज भरणार आहेत.

Nitesh Karale contesting Nagpur graduate constituency election

प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

आपण येत्या ५ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे नितेश कराळे यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज भरताना मोठी रॅली काढण्यात येणार असून, यासाठी विविध जिल्ह्यांमधून समर्थक उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरताना कराळे यांनी पदवीधर आणि बेरोजगार तरुणांचे प्रश्न हाती घेतले आहेत. एमपीएससी (MPSC) पेपरफुटीचे प्रकरण, परीक्षांमधील पारदर्शकता आणि जास्तीत जास्त शासकीय भरती यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते भर देणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील ठाकरे आणि शरद पवार गटात आधीच नाराजी आहे. दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपानुसार पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर या तीन जागा भाजपला, अमरावतीची जागा शिवसेनेला तर छत्रपती संभाजीनगरची जागा अजित पवार गटाला मिळाली आहे. या जागावाटपानंतर अनेक नेत्यांनी बंडखोरीची भूमिका घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या