आई करायची माळीकाम, आता BCCI कडून मिळाली मोठी जबाबदारी; परविंदर आवाना ज्युनियर निवड समितीचे नवे अध्यक्ष

भारताचे माजी वेगवान गोलंदाज परविंदर आवाना यांची बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ज्युनियर निवड समितीच्या नव्या अध्यक्षांची घोषणा केली. भारताचे ४० वर्षीय माजी वेगवान गोलंदाज परविंदर आवाना यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये स्थान मिळवणाऱ्या आवाना यांच्यासाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील हरोला गावातून आलेल्या परविंदर यांचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. ते १४ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर नोएडा प्राधिकरणात माळी म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या आईने अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांचे पालनपोषण करून त्यांना क्रिकेटपटू बनवले. आता 'हरोला एक्सप्रेस' अशी ओळख असलेल्या आवाना यांच्या नेतृत्वाखालील या निवड समितीत वेगवेगळ्या विभागांसाठी निवडकर्ता म्हणून कृष्णा दास, राकेश पटेल आणि एन. अर्जुन यादव यांचाही समावेश करण्यात आला आहे.

२००४ मध्ये ईएसपीएन महिंद्रा स्कॉर्पिओ स्पीडस्टर टॅलेंट हंट जिंकून सर्वात वेगवान गोलंदाज ठरल्यानंतर परविंदर चर्चेत आले. या यशामुळे त्यांना ऑस्ट्रेलियात माजी वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंग यांच्यासोबत प्रशिक्षणाची संधी मिळाली. पुढे २० डिसेंबर २०१२ रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मुंबईत झालेला इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. भारतासाठी त्यांनी केवळ हे दोनच सामने खेळले.

१ डिसेंबर २००७ रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आवाना यांनी २००७ ते २०१६ या काळात दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी २९.२३ च्या सरासरीने १९१ प्रथम-श्रेणी बळी घेतले, तर त्यांचा शेवटचा सामना थुंबा येथे झारखंडविरुद्ध होता. आयपीएलमध्ये ते किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळले. २०१४ च्या हंगामात बंगळुरू येथे झालेला अंतिम सामना हा त्यांचा शेवटचा आयपीएल सामना होता, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबला तीन गडी राखून पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशा संधी न मिळाल्यामुळे परविंदर आवाना यांनी २०१८ मध्ये वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षणाकडे मोर्चा वळवला. त्यांनी दिल्लीच्या १६, १९ आणि २३ वर्षांखालील संघांसह, भारताचा १९ वर्षांखालील संघ आणि बीसीसीआय/सेंटर ऑफ एक्सलन्सच्या अनेक उच्च-कार्यक्षमता कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या