प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावांचा रतीब घालूनही सरफराझ खानला भारतीय संघातून डावलले जात आहे. या मुद्द्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी प्रथमच स्पष्ट मत मांडले आहे. सरफराझच्या या स्थितीमागे क्रिकेट आणि त्याच्या कामगिरीपलीकडे वेगळेच काहीतरी कारण असावे, असा दावा त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर केला आहे.
जाफर यांच्या मते, सरफराझची चमकदार आकडेवारी सर्वांसमोर आहे. मात्र, निवड समितीला त्याला संघात घ्यायचेच नाही, असे चित्र दिसत आहे. "त्याने कितीही धावा केल्या आणि त्याची सरासरी कितीही असली तरी त्यांना त्याची निवड करायची नाही. यामागील नेमके कारण मला माहीत नाही, मात्र हे अत्यंत दुर्दैवी आहे," असे ते म्हणाले.
पूर्वीच्या काळी रणजी करंडक स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व होते, अशी आठवण जाफर यांनी सांगितली. रणजीतील चांगल्या कामगिरीमुळे दुलीप ट्रॉफी आणि त्यानंतर 'इंडिया अ' संघाचे दरवाजे उघडायचे. मात्र, आता परिस्थिती बदलली असून आयपीएलला अधिक महत्त्व आले आहे. निवड समिती आणि खेळाडूंचे आयपीएलकडे लक्ष असते. अनेक खेळाडू आयपीएलमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचत आहेत. रिंकू सिंह आणि तिलक वर्मा हे दोन्ही खेळाडू तिन्ही फॉरमॅटचे प्लेयर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरफराझने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये ९६ फर्स्ट क्लास डावांमध्ये १८ शतके झळकावली आहेत. त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सरासरी तब्बल ७०.६७ इतकी आहे. अलीकडेच हिमाचल प्रदेशविरुद्धच्या शेवटच्या रणजी सामन्यातही त्याने १५४ धावांची खेळी केली. २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारताकडून खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ३७.१० च्या सरासरीने एक शतक आणि तीन अर्धशतके केली आहेत.
एवढी दमदार आकडेवारी असूनही तो सातत्याने निवड समितीच्या रडारबाहेर आहे. ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेवेळी साई सुदर्शन जखमी झाल्याने सरफराझला बदली खेळाडू म्हणून बोलावण्यात आले होते. पण तिथेही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते, याबद्दल जाफर यांनी आश्चर्य व्यक्त केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- अक्षर पटेलला नेमकं झालंय तरी काय? टीम इंडियाचा भरवशाचा गोलंदाज अचानक ठरतोय महागडा
- न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आधी टीम इंडियात मोठा बदल; ईशान किशन बाहेर, कुमार कुशाग्रला संधी
- दुसऱ्या T20 पूर्वी वैभव सूर्यवंशीने बदलली सरावाची दिशा, नेट्समधील प्रॅक्टिस पाहून सगळेच थक्क




