नालासोपारा, 14 ऑक्टोबर: नालासोपारा-वसई लिंक रोडवरील 'इंपिरियल हाईट्स' या १४ मजली इमारतीत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून फाल्गुनी शाह (५०) आणि अश्विनी पारकर (५०) या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहा जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जीव वाचवण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे गॅलरीबाहेर लटकलेल्या चार जणांचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.
इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील एका घरातून ही आग भडकली होती. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत असताना, १३ व्या मजल्यावरील चार रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी बाहेरील गॅलरीचा आधार घेतला. तब्बल ४० ते ४५ मिनिटे हे नागरिक मृत्यूशी झुंज देत मदतीची वाट पाहत होते. अखेर वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने क्रेनच्या साहाय्याने या चारही जणांची सुखरूप सुटका केली. याच थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आगीचे लोळ दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. यामुळे रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. वसई-विरार आणि मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने संयुक्तपणे तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी ३० ते ४० नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. महापौर आजीव पाटील यांनी बाधित रहिवाशांची तात्पुरती सोय जवळच्या एका हॉलमध्ये केली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ही इमारत केवळ चार ते पाच वर्षे जुनी आहे. त्यामुळे इतक्या नव्या इमारतीला आग कशी लागली? येथील अग्निशमन यंत्रणा (फायर सिस्टीम) कार्यरत होती की नाही? तसेच, या इमारतीला पालिकेने कशी परवानगी दिली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs WI: ‘पॉवरप्लेच्या चुका टाळल्यास भारताला सहज हरवू’, पिछाडीवर असलेल्या विंडीज कोचचे थेट आव्हान
- अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच सीजेपीला मोठा धक्का; दोन नेत्यांची ५ दिवसांसाठी तुरुंगात रवानगी
- आंदोलनाला न गेल्याने नाना पाटेकरांनी मागितली अभिजीत दिपके यांची माफी? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य उघड





