पुणे, 21 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि मूळचा पुणेकर असलेल्या केदार जाधव याची एक वेगळी बाजू समोर आली आहे. केदारने नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनात सहभाग घेतला असून, त्याचा संघाच्या गणवेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पुण्यातील डेक्कन जिमखाना कॉलनी येथे २० ऑक्टोबर रोजी संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील पथसंचलनात केदार जाधव सहभागी झाला होता. त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो पांढरा शर्ट, खाकी पँट, काळी टोपी आणि हातात दंड अशा पूर्ण गणवेशात दिसत आहे. 'संघाचे पथसंचलन म्हणजे केवळ शिस्तबद्ध पावलांचा…' असा उल्लेख करत त्याने संघाशी संबंधित घडामोडी आणि विचारांचा संदेशही या पोस्टसोबत दिला आहे.
वयाच्या ४१ व्या वर्षी, ३ जून २०२४ रोजी केदार जाधवने सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती स्वीकारत असल्याची माहिती दिली होती. त्यापूर्वी, १६ नोव्हेंबर २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय (वनडे) सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते.
आपल्या कारकीर्दीत त्याने भारतासाठी ७३ वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही योगदान देत त्याने वनडेत २७ विकेट्स मिळवल्या आहेत. याशिवाय, नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १२३.२३ च्या स्ट्राईक रेटने त्याने ५८ धावा केल्या.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) केदारने चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले. विशेषतः महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळताना त्याने अनेकदा उपयुक्त कामगिरी केली. आयपीएलमधील एकूण ९५ सामन्यांत १२३.१७ च्या स्ट्राईक रेटने त्याने ११९६ धावा केल्या असून, त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘इंडियन आयडॉल’चा गायक थेट ऑस्ट्रेलियात करणार अंपायरिंग; पुण्याच्या पराशर जोशींची अनोखी झेप
- IND vs NZ: ‘कारणे देण्यापेक्षा विजयाचा मार्ग शोधा’; मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरचा संघाला स्पष्ट संदेश
- स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरमध्ये वाद? सामन्यानंतर हस्तांदोलन टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल




