कांगडा, 14 ऑक्टोबर: नवरात्रीच्या पवित्र काळात प्रसिद्ध कथावाचक आणि भजन गायिका जया किशोरी यांनी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील माता श्री बगलामुखी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. एरवी अनारकली सूटमध्ये दिसणाऱ्या जया किशोरी यावेळी पिवळ्या साडीत मंदिरात पोहोचल्या होत्या. त्यांचा हा साधा आणि सोज्वळ लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यांचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
त्यांनी नेसलेल्या हळदी रंगाच्या साडीवर मध्यम आकाराची जांभळ्या रंगाची बॉर्डर आहे. नेहमीप्रमाणे कपाळावर काळी टिकली, कानात छोटे इअररिंग्ज आणि एका हातात लाल बांगड्या असा त्यांचा साधा पण आकर्षक पेहराव होता. मंदिर परिसरामध्ये हात जोडतानाचे त्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच, जया किशोरी यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचे आणि मंदिराचे फोटो शेअर केले आहेत.
श्रोत्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मोटिव्हेशनल स्पीकरच्या साध्या राहणीमानाचे नेहमीच कौतुक होते. श्री बगलामुखी मंदिरात जाण्यापूर्वी त्यांनी विश्वप्रसिद्ध शक्तिपीठ असलेल्या श्री ज्वालामुखी मंदिर आणि कांगडा येथील आणखी एका मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.
श्री ज्वालामुखी मंदिरात त्यांनी विधिवत पूजाअर्चा केली आणि मातेच्या पवित्र ज्योतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी राणी पिंक (गुलाबी) रंगाचा सूट परिधान केला होता. साडीसोबतच त्यांचे सूटमधील हे फोटोसुद्धा समोर आले असून, या साध्या लूकमध्येही त्या अत्यंत सुंदर दिसत आहेत.





