प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या राजकारणाबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे विधान केले आहे. "डंके की चोटवर सांगतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत," असा ठाम दावा सदावर्ते यांनी केला आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर हसून प्रतिक्रिया देत, शिरसाट जे काही बोलत आहेत ते त्यांचे शिंदेंवरील व्यक्तिगत प्रेम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी सदावर्ते यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या नेत्यांना 'ऑरगॅनिक राजकारणी' असे म्हटले आहे. हे तीनही नेते 'रोज फ्लॉवर'सारखे (गुलाबाच्या फुलासारखे) दिसत असून, यातून महाराष्ट्राने एक वेगळा आदर्श घेतल्याचे त्यांनी सांगितले. याउलट, एकनाथ शिंदे यांचे राजकारण हे 'संकरित राजकारण' असल्याची सडकून टीका त्यांनी केली. अशा संकरित राजकारणामुळेच राजा मंत्री होत असतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असे संकरित राजकारण नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना, त्यांचे राजकारण पाकिस्तानी नसून त्यांच्याशी आपले कोणतेही वैयक्तिक भांडण नाही, केवळ काही मुद्द्यांवर विरोधी भाष्य करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.
"आम्ही काही भाजपचे प्रवक्ते नाही, पण उद्धव ठाकरे साहेबांनी उद्याच्या दिवाळीसाठी मुख्यमंत्र्यांना का बोलावू नये?" असा थेट सवालही सदावर्ते यांनी उपस्थित केला. जर मुख्यमंत्र्यांना माझ्या घरी बोलावले तर त्यांना यावे लागेल, आणि उद्धवजींनी बोलावले तर तिथेही जावे लागेल, असे ते म्हणाले. यासोबतच पूर्णेकर कुटुंबाच्या मुद्द्यावर भाष्य करत, पोलिसांनी या प्रकरणात अजिबात हयगय करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणात कोणीतरी 'दाढीवाला अजगर' किंवा एखादा डीसीपी अधिकारी असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली असून, येत्या काही दिवसांत यातील लाईन क्लिअर होईल, असेही ते म्हणाले.
भाजपचे नवनाथ बन हे आमच्या रक्ताचे आहेत, त्यांची जर कोणी लायकी काढली तर त्यांना त्यांच्या लायकीत राहावे लागेल, असा इशारा सदावर्ते यांनी दिला. शेवटी त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांबद्दल गायकवाड यांनी केलेले वक्तव्य हे दलबद्रीपणाचे असून ही कोणती विचारधारा आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सर्व काँग्रेसच्या विचारधारेतून आणि संकरित राजकारणातून समोर येत असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- निवडणुका नसताना एवढी घाई का? सर्वोच्च न्यायालयाच्या विचारणेनंतर ६ राज्यांचे ‘SIR’ वेळापत्रक बदलले
- आम्ही उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती; फडणवीस-ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांचे मोठे विधान
- भारताविरुद्धच्या शतकी खेळीचे ग्लेन फिलिप्सने दिले आयपीएलला श्रेय




