प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून 'ऑक्टोबर हीट'चा प्रभाव जाणवू लागला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) पावसाचा मोठा इशारा दिला असून, आज राज्यामध्ये पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचे वातावरण राहणार आहे.
राज्यात वाऱ्याची दिशा पुन्हा फिरल्याचे पाहायला मिळत असून विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने सोलापूर, कोल्हापूर, पुणे, धाराशिव आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला असून, या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
एकीकडे काही भागांत पाऊस, तर दुसरीकडे कडक उष्णता असे दुहेरी चित्र सध्या राज्यात आहे. कोकणात हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदा हवामान विभागाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यातून मॉन्सून परतल्याचे सांगितले जात असतानाच, आता पुन्हा वारे फिरल्यामुळे पावसाला अनुकूल असे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने हा नवा अलर्ट दिला आहे.




