अमरावती, 15 ऑक्टोबर: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या शिंदे गटाच्या बंद दाराआड बैठकीतील आमदार बच्चू कडू यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी मतांच्या जुळवाजुळवीसाठी प्रत्येकाला 'प्रसाद' पोहोचल्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार बच्चू कडू उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर बोलताना बच्चू कडू यांनी आपली फळी निश्चित केल्यानंतर मुस्लिम गटांची मते आपल्याकडे कशी वळवता येतील, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच, प्रत्येक तालुक्यात आपली यंत्रणा कामाला लागली असून सर्वांपर्यंत 'प्रसाद' पोहोचला असल्याचे त्यांनी भाषणादरम्यान सांगितले.
बैठकीत भाषण सुरू असतानाच कोणीतरी मोबाईलवर रेकॉर्डिंग करत असल्याचे बच्चू कडू यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित व्यक्तीला रेकॉर्डिंग करण्यापासून रोखले आणि त्याला बाहेर काढण्याचे निर्देश दिले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मतांच्या राजकारणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपने ही जागा शिंदे शिवसेनेसाठी सोडली असून, विद्यमान आमदार किरण सरनाईक हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यासोबतच संगीता शिंदे, शेखर भोयर आणि डॉ. सुमित पवार यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून मोठी बंडाळी झाली आहे. ठाकरे गटाने प्रा. डी. एस. लहाने यांना उमेदवारी जाहीर केली, तर काँग्रेसने प्रा. आदिती पोहरे यांना तिकीट दिले आहे. याशिवाय विज्युक्टा संघटनेचे डॉ. अविनाश बोर्डे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व घडामोडींमुळे मतविभाजनाचा नेमका फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.




