इंडिया आघाडी आणि सीजेपीने एकत्र लढावे! ज्ञानेश कुमारांविरोधातील लढ्यासाठी अभिजीत दिपकेंची एकजुटीची हाक

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीला एकजुटीची हाक दिली असून सरकारने आंदोलकांमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीला एकजुटीची हाक दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सरकार जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वृत्तसंस्था 'पीटीआय'शी बोलताना आणि १३ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे दिपके यांनी इंडिया आघाडी आणि सीजेपीला सरकारच्या जाळ्यात न अडकता एकत्र लढण्याचे आवाहन केले.

आंदोलकांमध्ये सरकार अविश्वास निर्माण करत असल्याचा दावा करत दिपके यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जेव्हा सीजेपीला आंदोलनाची परवानगी मिळाली, तेव्हा आम्ही भाजपची टीम असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. काल इंडिया आघाडीने मोठे आंदोलन केले, पण १० ऑक्टोबरला आमच्यावर जशी कडक कारवाई करण्यात आली, तशी त्यांच्याबाबत झाली नाही. वेगवेगळ्या आंदोलनांना वेगळी वागणूक देऊन सरकार समान उद्देशासाठी लढणाऱ्या लोकांमध्ये जाणीवपूर्वक संशय निर्माण करत आहे."

विरोधकांनी या डावपेचांना बळी पडू नये असे सांगत दिपके म्हणाले, "माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की हे डावपेच ओळखा. आज ते एका आंदोलनाला परवानगी देतील आणि दुसरे दडपून टाकतील. उद्या कदाचित भूमिका बदलतील. उद्देश एवढाच आहे की आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी एकमेकांवर संशय घ्यावा. आपण आपापसात लढण्याच्या चक्रव्यूहात न अडकता एकत्र उभे राहिले पाहिजे. ही लढाई ज्ञानेश कुमार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या विरोधात आहे, हे विसरू नका."

दरम्यान, जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिन्ही नेत्यांना न्यायालयीन कोठडीअंतर्गत तिहार तुरुंगात पाठवले जाण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित अवमान याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या