प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले तब्बल सहा वर्षांच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू होत असलेल्या 'मराठी मिडियम' या मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या मालिकेत भार्गवी एका वेगळ्या धाटणीच्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
या मालिकेत भार्गवी 'विशाखा शुक्रे' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. विशाखा ही एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातून आलेली महिला असून, ती स्वतःच्या मतांवर अत्यंत ठाम असते. तिचा नवरा स्वभावाने चांगला असला तरी तो कर्तृत्वात कमी पडत असल्याचे तिने फार पूर्वीच ओळखले होते. त्यामुळे आपल्या मुलाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवू नये, यासाठी तिने त्याच्या संगोपनात कोणतीही कसर सोडलेली नाही.
विशाखा शुक्रे या पात्राला प्रत्येक गोष्ट परिपूर्ण लागते. तिला ब्रँडेड नसलेल्या गोष्टींचा आणि अस्वच्छतेचा प्रचंड तिटकारा आहे. तिला टेबल मॅनर्स आणि शिष्टाचारांचे मोठे महत्त्व वाटते. 'जे जे परदेशी, ते ते उत्तम' या विचारांवर तिचा ठाम विश्वास असल्याने जुन्या चालीरीती व परंपरांना तिच्या लेखी काहीही महत्त्व नाही.
आपल्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, "सहा वर्षांनंतर स्टार प्रवाहसोबत पुन्हा जोडले जाणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचे आहे. वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या विषयांच्या मालिका हाताळते. 'मराठी मिडियम'ची कथा आणि विशाखा शुक्रे हे पात्र माझ्यासाठी खूपच वेगळे आहे. मी याआधी फारशा निगेटिव्ह भूमिका केल्या नसल्याने हे पात्र साकारताना माझा कस लागतोय. विशाखाची स्वतःची अशी एक विचारसरणी असून, यातून माझा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल."
संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा पवार साकारणार आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रद्धाने शालेय जीवनात विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या कलेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले असून, तिचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे.





