मुंबई, 23 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध गायक दलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टवर ग्रेनेड हल्ला करण्याबाबतचाही धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत सध्या अशा धमक्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या धमक्या केवळ सेलिब्रिटींपुरत्याच मर्यादित नाहीत. मुंबईच्या महापौर कार्यालयासह दादर परिसरातील काही प्रमुख शाळांनाही अशाच पद्धतीचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली. ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार (SOP) शहरातील विविध भागांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली. श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने पोलिसांनी 'जलसा' बंगल्याचा परिसर, महापौर कार्यालय आणि संबंधित शाळांची कसून तपासणी केली.
या शोध मोहिमेत आतापर्यंत कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हे धमकीचे ई-मेल बोगस असल्याचा प्राथमिक अंदाज असून, मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- SBI बँकेवर सायबर हल्ला; डार्क वेबवर ग्राहकांचा डेटा लीक, ‘सर्ट-इन’कडून तपास सुरू
- स्मृती मानधना कर्णधार होताच टीम इंडियाला दुसरा धक्का, सलामीवीर एस. मेघनाची तडकाफडकी निवृत्ती
- के. एल. राहुलच्या जागी इंडिया ‘अ’ संघात शिखर मोहनची निवड; कोण आहे हा २१ वर्षीय खेळाडू?




