प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील प्रेमळ संवादाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याने अमिताभ यांचं जाहीर कौतुक केल्यानंतर, त्यांनी दिलेल्या मिश्किल प्रतिक्रियेने उपस्थितांसह नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस पार पडला असून कुटुंबीय आणि चाहत्यांनी तो मोठ्या उत्साहात साजरा केला. याच दरम्यान ऐश्वर्या रायसोबतचा हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय अमिताभ बच्चन यांना प्रेमाने मिठी मारताना दिसते आणि ते सर्वोत्तम असल्याचं सांगत त्यांचे कौतुक करते.
ऐश्वर्याने कौतुक केल्यानंतर अमिताभ यांनी मिश्किल स्वरात तिला 'आराध्या सारखं वागणं बंद कर' असे सांगितले. त्यावर उत्तर देताना ऐश्वर्या राय म्हणाली, “ते सगळ्यांना माहिती आहे मी तुमची अराध्या आहे”. या संवादातून दोघांमधील जिव्हाळ्याचे कौटुंबिक नाते दिसून येते.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी दोघांमधील हे हळवे आणि गोड नाते पाहून त्यांचे कौतुक केले, तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर टीकाही केली आहे.




