प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाली आहे. स्वतः बँकेनेच या सायबर हल्ल्याबाबत स्पष्टीकरण दिले असून, ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
एसबीआयने २१ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, डार्क वेबवरील तब्बल तीन लाख नोंदींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एसबीआयच्या ३,८९७ ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरीला गेलेल्या या डेटामध्ये ग्राहकांचे नाव, जन्मतारीख, लिंग, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि घराचा पत्ता यांसारख्या महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे.
या वैयक्तिक माहितीव्यतिरिक्त बँकेच्या शाखेशी संबंधित तपशील, ग्राहक ओळख क्रमांक (CIF), लीड आयडी आणि कर्जाच्या नोंदीदेखील लीक झाल्याचे समोर आले आहे. डार्क वेब हा इंटरनेटचा असा भाग आहे जो सामान्य सर्च इंजिनवर दिसत नाही, जिथे हॅकर्स चोरी केलेल्या डेटाची निनावीपणे बेकायदेशीर विक्री करतात. या सायबर हल्ल्यात नेमकी किती माहिती उघड झाली आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
डेटा लीक झाल्याचे समजताच बँकेने तातडीने सायबर सुरक्षेशी संबंधित प्रक्रिया सुरू केली आहे. या गंभीर प्रकरणाच्या सखोल चौकशीची जबाबदारी बँकेने 'सर्ट-इन' (CERT-In) या राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थेकडे सोपवली आहे. ही माहिती खरोखरच कुठून लीक झाली आणि त्याचा ग्राहकांवर किती मोठा परिणाम होऊ शकतो, याचा सविस्तर तपास सध्या यंत्रणांकडून केला जात आहे.
या घटनेमुळे ग्राहकांच्या मनात खात्यातील पैशांबाबत प्रश्न निर्माण झाले असले तरी, या डेटा लीकचा बँकेच्या मुख्य कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे एसबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेचे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉल्स, मेसेजेस किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, तसेच आपला ओटीपी, पासवर्ड किंवा कोणतीही बँकिंग माहिती शेअर करू नये, असे आवाहन बँकेने केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मृती मानधना कर्णधार होताच टीम इंडियाला दुसरा धक्का, सलामीवीर एस. मेघनाची तडकाफडकी निवृत्ती
- के. एल. राहुलच्या जागी इंडिया ‘अ’ संघात शिखर मोहनची निवड; कोण आहे हा २१ वर्षीय खेळाडू?
- पहिल्या टी-२० मधील पराभवानंतर किवी खेळाडू भडकला; झेलांच्या प्रश्नावर ग्लेन फिलिप्सचा संताप




