पुणे, 14 नोव्हेंबर: दिवाळीनंतर सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागणार असून, राज्यात गायी आणि म्हशीच्या दुधाचे दर प्रतिलिटर चार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकुळ, चितळे, कात्रज आणि सोनाई यांसारख्या प्रमुख ब्रँड्सचे नवे दर सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत.
राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या बैठकीत या दरवाढीवर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला ४५ दूध संघांचे ५० प्रतिनिधी हजर होते. अमूलने अलीकडेच दूध महाग केले होते, त्यानंतर आता महाराष्ट्रातील या प्रमुख संघांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. यासोबतच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे.
या दरवाढीमागे उत्पादन खर्चात झालेली वाढ हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक खर्च वधारला आहे. याशिवाय साखर, पॅकिंग साहित्य आणि मजुरीच्या खर्चातही मोठी भर पडली आहे. तसेच, दुधाच्या खरेदी दरातील वाढ आणि भविष्यातील संभाव्य दरवाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
सीएनजी आणि पीएनजीच्या दरवाढीनंतर आता दूधही महागल्याने ग्राहकांचा आर्थिक भार वाढणार आहे. मात्र, या निर्णयामुळे वाढता उत्पादन, पॅकिंग आणि वाहतूक खर्च सावरण्यास मदत होईल. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळण्यास यातून हातभार लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- ‘आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा’; पीजी प्रवेश न मिळाल्याने KEM मधून MBBS झालेल्या २५ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या
- महाराष्ट्रात वातावरणाचा लपंडाव: १४ नोव्हेंबरसाठी हवामान खात्याचा इशारा, राज्यात दुहेरी ऋतूचा अनुभव
- मुळशीत पर्यटनाला गेलेल्या तरुणाचा २०० फूट दरीत पडून मृत्यू; ‘शॉर्टकट’ जिवावर बेतला




