प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांचे जोरदार समर्थन केले आहे. राहुल गांधींनी केलेले फोन टॅपचे आरोप खोटे नसून ती पूर्णपणे वस्तुस्थिती असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की 'वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र' यांनी आपलाही फोन टॅप केला होता, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
या प्रकरणाचा दाखला देताना पटोले म्हणाले की, ज्या रश्मी शुक्ला यांनी माझा फोन टॅप केला होता, त्यांना महाविकास आघाडीच्या काळात केंद्रात पाठवण्यात आले होते. मात्र, राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येताच त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणून पोलीस महासंचालक (डीजी) पदावर बसवण्यात आले. इतकेच नाही तर, त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ देऊन एकप्रकारे बक्षीसच देण्यात आले. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालून विरोधकांचे फोन टॅप करायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचे, हे भाजपचे अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप करणे, मतांची चोरी करणे आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणे या सगळ्या प्रकारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन उत्तरे द्यावीत आणि देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली. या प्रवृत्तीमध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारून मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा थेट इशाराही त्यांनी दिला.
यापूर्वी, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आपला फोन टॅप करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. इन्स्टाग्रामवरील एका युझरने त्यांना विचारले होते की, पंतप्रधान तुमच्यावर परकीय मदत घेत असल्याचा दावा करतात, तर तुम्ही परकीय शक्ती पंतप्रधानांना नियंत्रित करत असल्याचा आरोप करता, याला काय पुरावा आहे? यावर उत्तर देताना गांधी यांनी स्वतःच्या फोनकडे बोट दाखवत सगळे पुरावे याच फोनमध्ये असल्याचे म्हटले होते. आपला फोन टॅप केला जात असल्यानेच पंतप्रधानांना आपल्याविषयी माहिती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
ज्या दिवशी पंतप्रधान मोदी आपल्यासोबत समोरासमोर चर्चेसाठी तयार होतील, त्या दिवशी परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली नेमके कोण आहे हे सर्वांना स्पष्ट होईल, असे थेट आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे. तसेच पंतप्रधान किती काळापासून देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत आणि त्यासंबंधीची इतर माहितीही आपण उघड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- सतेज पाटलांना कायद्याने वेसण घालणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा, शिक्षण संस्थांसाठी मार्चमध्ये नवा कायदा
- फोन टॅपिंगचे आरोप निराधार अन् बालिश; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात
- एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात कडाक्याची थंडी नाही, हवामान विभागाचा अंदाज




