सतेज पाटलांना कायद्याने वेसण घालणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा, शिक्षण संस्थांसाठी मार्चमध्ये नवा कायदा

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सतेज पाटलांना इशारा. खासगी शिक्षण संस्थांच्या मनमानी फी वसुलीला आळा घालण्यासाठी मार्चमध्ये नवा कायदा आणणार.

mahasatta

मुंबई, 13 नोव्हेंबर: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीतील संघर्ष आता राज्य पातळीवर अधिकच तीव्र झाला आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, त्यांना कायद्यानेच वेसण घालण्याचा कडक इशारा दिला आहे. यासोबतच, खासगी शिक्षण संस्थांकडून होणाऱ्या मनमानी फी वसुलीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच कठोर पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर सरकारचे नियंत्रण राहावे यासाठी येत्या मार्च महिन्यात 'एफआरए' (FRA) कायदा आणला जाणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. हा कायदा लागू होऊ नये यासाठी सतेज पाटील मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने भेटी घेत असल्याचा दावाही त्यांनी केला. या नव्या कायद्यामुळे मनमानी वसुली करणाऱ्यांवर थेट कारवाई करणे शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षण संस्थाचालकांची झोप आपण नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने उडवली असल्याचे पाटील यांनी नमूद केले. एका विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने मोठी प्रश्नावली दिली आहे. याची उत्तरे दिवाळीनंतर द्यावी लागणार असल्याने, खासगी विद्यापीठ चालकांची झोप नक्कीच उडेल, असे ते म्हणाले. सोबतच डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा सातबारा तपासा, तो कोणाच्या नावावर आहे हे उघड होईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचा संचालक विराजमान झाल्यानंतर पाटील यांनी ही जाहीर टीका केली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कोणीही चुकीचे बोलल्यास आपण खपवून घेणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांचे साम्राज्य अवघ्या पाच मिनिटांत उद्ध्वस्त करू, या आपल्या जुन्या विधानाचा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या