राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या दाव्याला सपकाळ, राऊतांचा दुजोरा; मोदी-शाहांवर हल्लाबोल

राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या आरोपाला हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत यांनी दुजोरा दिला असून, यावरून मोदी-शाह सरकारवर सडकून टीका केली आहे.

mahasatta

मुंबई, 13 नोव्हेंबर: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे.

फोन टॅपिंगबाबत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा केवळ आरोप नसून ही एक वस्तुस्थिती आहे. भाजपच्या दिवंगत नेत्यांसह काही लोकांच्या मोबाईलमध्ये पेगासस इंस्टॉल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी हे प्रकरण आणि एप्सिटीन फाईलही दाबण्यात आली. भाजप कायम खोट्याला पाठीशी घालत असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावरून खासदार संजय राऊत यांनीही मोदी-शाह सरकारवर निशाणा साधला. या राजवटीत दुसरे काय घडणार, असा सवाल करत त्यांनी नेतान्याहू आणि निक्सन यांचे उदाहरण दिले. फोन टॅपिंग करणारे हे नेते पराभूत होऊन राजकारणातून हद्दपार झाले. मोदींच्या राजकारणालाही घरघर लागली असून, त्यांची सत्ता जाण्याच्या मार्गावर नाही, तर ती आधीच गेली आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरूनही सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. भाजीपाला, गॅस आणि मोबाईल रिचार्जचे दर वाढत असून त्यावर बाहेरून नियंत्रण ठेवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. इंधनावरील करांबाबत सरकार विचार करत नाही. महागाई आटोक्यात आणण्याऐवजी सरकार केवळ मागणी-पुरवठ्याचा खेळ करत असून भविष्यात महागाईचा आणखी भडका उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका इन्स्टाग्राम युझरला उत्तर देताना आपला फोन टॅप होत असल्याचा थेट आरोप पंतप्रधान मोदींवर केला होता. फोनकडे बोट दाखवत त्यांनी सर्व पुरावे याच मोबाईलमध्ये असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान ज्या दिवशी समोरासमोर चर्चेला बसतील, तेव्हा परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण आहे, हे सर्वांना समजेल. तसेच, पंतप्रधान किती काळापासून देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत, याची माहितीही आपण उघड करू, असा इशारा गांधी यांनी दिला होता.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या