लातूर, 13 नोव्हेंबर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी एक अत्यंत गंभीर दावा केला आहे. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याच अपहरणाचा कट रचला गेल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला असून, या विधानामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काही दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे बँक निवडणुकीतील एका मतदाराला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे आमच्या 'सहकार पॅनल'मधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनाच पळवून नेण्याचा विरोधकांचा प्लॅन होता, मात्र आम्ही हे कसे होऊ देणार, असा इशारा देशमुख यांनी दिला.
या निवडणुकीतील बहुमताच्या गणितावर बोलताना देशमुख यांनी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. या निवडणुकीत निव्वळ काठावरचे बहुमत मिळवून उपयोग नाही, तर स्पष्ट बहुमत मिळवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यासोबतच, विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सध्या केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने सहकारी संस्थांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. कमळ, हात, घड्याळ किंवा धनुष्यबाण यांसारख्या पक्षीय चिन्हांपेक्षा सहकाराचे हित आणि तत्त्वे जपणे जास्त महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच, लातूरच्या भल्यासाठी होणाऱ्या या मतदानातून थेट मुंबई आणि दिल्लीपर्यंत एक स्पष्ट संदेश गेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, ‘मर्जरच्या खेळाचे नियम ठरवावे लागतील’
- हवामान बदलामुळे वाढतोय आजारांचा धोका; संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
- “ती मोठी चूक होती”, गुजरात टायटन्स सोडण्याच्या निर्णयावरून मोहम्मद कैफची हार्दिक पांड्यावर टीका




