नाशिक, 13 नोव्हेंबर: राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. सध्या राज्यात 'मर्जर-मर्जर'चा खेळ सुरू असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन योग्य वेळी यावर निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या कोण कुणाची भेट घेत आहे आणि नेमकी काय चर्चा सुरू आहे, याचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याचे भुजबळ म्हणाले. एखाद्या क्रिकेटच्या खेळासारखी स्थिती असून, आपल्यातील कुणीतरी एकटाच जातो आणि चर्चा करतो, असे ते म्हणाले. अशा तुटक चर्चांऐवजी सर्वांनी एकत्रित बसून विलीनीकरणाच्या या खेळाचे नियम ठरवायला हवेत, तसेच दोन्ही बाजूंनी सांघिक खेळ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आपल्याला नक्कीच आनंद होईल, असे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, ते असते तर त्यांनी सर्वांना सांभाळून घेत वाटचाल केली असती, असेही ते म्हणाले.
सध्या आपला गट 'एनडीए'सोबत असून शरद पवार यांचा पक्ष 'इंडिया' आघाडीत आहे. त्यामुळे विलीनीकरण करून एकत्र आल्यावर नेमके कुणासोबत राहायचे, हा मोठा पेच असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच, भाजप आणि मुख्यमंत्र्यांना डावलून किंवा त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही पाऊल उचलता येणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
आपल्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन मोठे मार्गदर्शक असल्याचे सांगत भुजबळांनी पवार यांच्यासोबतच्या संबंधांवर मत मांडले. राजकारणात मतभेद असले तरी शरद पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व प्रगल्भ नेते असून ते नेहमी नातेसंबंध जपतात, असे भुजबळ म्हणाले. आपण आजही त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यात पवार साहेब आणि आपलाच सिंहाचा वाटा असून बाकीचे लोक पक्षात नंतर आल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- हवामान बदलामुळे वाढतोय आजारांचा धोका; संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
- “ती मोठी चूक होती”, गुजरात टायटन्स सोडण्याच्या निर्णयावरून मोहम्मद कैफची हार्दिक पांड्यावर टीका
- इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीपूर्वी बांगलादेशची आयर्लंडशी खेळण्याची योजना




