राज्यात थंडीची चाहूल! तापमानात मोठी घट होणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडील वातावरणाचा प्रभाव जाणवू लागला असून, येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या वातावरणात बदल जाणवू लागला असून, उत्तरेकडील स्थितीचा प्रभाव आता राज्यावर दिसून येत आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. १३ नोव्हेंबर रोजी वातावरण प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहील. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका तर रात्री आणि पहाटे गारवा, असे दुहेरी वातावरण राज्यात अनुभवायला मिळेल.

शुक्रवारी उत्तर आणि दक्षिण कोकणात आकाश पूर्णपणे निरभ्र राहील आणि पावसाची कोणतीही शक्यता नाही. येथील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश, तर किमान तापमान १८ ते २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही दिवसभर कडक ऊन राहील. मात्र, पुढील दोन दिवसांत या भागात किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होऊन पहाटेचा गारठा वाढेल.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव जास्त जाणवत असून, रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी येथेही हवामान कोरडे राहील. किमान तापमानात १ ते २ अंशांची घट आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे हे वातावरण शेतीच्या कामांसाठी अत्यंत पोषक ठरणार आहे.

विदर्भात अमरावती आणि नागपूरसह सर्व जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. येथे कमाल तापमान ३४ अंशांच्या दरम्यान स्थिर राहील, तर किमान तापमान १८ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. पाऊस थांबल्याने व आकाश निरभ्र असल्यामुळे दिवसा थेट पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे उकाडा जाणवत आहे. मात्र, रात्री जमिनीवरील उष्णता वेगाने कमी होत असल्याने पहाटे 'गुलाबी थंडी'चा अनुभव येत असून, आगामी काळात हा गारठा आणखी वाढेल.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या