दुखापतीच्या नैराश्यातून मुंबई पोलीस दलातील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय बागुल या जवानाने पायाच्या दुखापतीमुळे आलेल्या नैराश्यातून कुर्ला येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

mahasatta

मुंबई, 13 नोव्हेंबर: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय बागुल असे या मृत पोलीस शिपायाचे नाव असून ते सध्या दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

बागुल हे कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस वसाहतीमध्ये कुटुंबासह राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या अनेक दिवसांपासून पायाच्या अंतर्गत दुखापतीने त्रस्त होते. वैद्यकीय उपचार करूनही पायाच्या वेदना कमी होत नसल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते. याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर बागुल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बागुल हे २००९ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले होते आणि गेल्या चार वर्षांपासून ते दिंडोशी पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी कोमल, दहा वर्षांचा मुलगा यश आणि सहा वर्षांची मुलगी श्रावणी असा परिवार आहे. बागुल यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी नाशिक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या