प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, रोहितने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी आपण उपलब्ध असल्याची माहिती स्वतः मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दिली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेनंतर तो मुंबईच्या संघात सहभागी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात 'एमसीए'च्या एका सूत्राने माहिती देताना सांगितले की, “विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपण मुंबईकडून खेळणार असून, श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर मला उपलब्ध समजावे, असे त्याने आम्हाला कळवले आहे. तो नेमक्या किती सामन्यांसाठी उपलब्ध असेल, याची माहिती नंतर देईल.”
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका १३ ते १९ डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद येथे पार पडेल. दुसरीकडे, विजय हजारे ट्रॉफीचा प्राथमिक टप्पा १४ ते २९ डिसेंबर या काळात होणार असून, बाद फेरीचे सामने २ ते ८ जानेवारी दरम्यान रंगतील.
आंतरराष्ट्रीय सामने नसताना खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, अशा सूचना बीसीसीआयने दिल्या होत्या. या निर्णयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. रोहितनेही २०१८ नंतर पहिल्यांदाच मागील हंगामात विजय हजारे ट्रॉफीत सहभाग नोंदवला होता.
मागील हंगामात सिक्कीमविरुद्धच्या पहिल्याच लढतीत खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये रोहितने ९४ चेंडूत १५५ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. मात्र, त्यानंतर उत्तराखंडविरुद्धच्या पुढच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. दरम्यान, आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे सोपवले जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही जणांचा फोन २०१९ नंतर थांबला तो थांबलाच’, उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
- रेल्वेच्या ॲडव्हान्स तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल; आता १२० ऐवजी ६० दिवस आधीच करता येणार आरक्षण
- राधिका आपटेचा देवावर विश्वास नाही; म्हणाली, “लोकांनी मूर्तीपेक्षा निसर्गाची पूजा करावी”




