‘रोहित पवार लबाड लांडगा, राजकारणातला कलंक’, उजनीतील डेटा सेंटरवरून भाजप आमदारांची सडकून टीका

उजनीतील डेटा सेंटरला विरोध करणाऱ्या आमदार रोहित पवारांवर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार टीका करत त्यांना लबाड लांडगा आणि राजकारणातील कलंक म्हटले आहे.

mahasatta

सोलापूर, 31 ऑक्टोबर: उजनी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या एआय डेटा सेंटरच्या मुद्द्यावरून सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी सडकून टीका केली आहे. रोहित पवार हे 'लबाड लांडग्यासारखे' असून ते केवळ शेतकरी हिताचे सोंग करत असल्याचा घणाघात आमदार कोठे यांनी केला.

उजनीतील या प्रस्तावित डेटा सेंटरवरून सध्या सोलापुरात दोन गट समोरासमोर आले आहेत. एका बाजूला रोहित पवार या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनात उतरले असताना, दुसऱ्या बाजूला भाजपने डेटा सेंटरला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन करत रोहित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान बोलताना आमदार कोठे यांनी पवारांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. "रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे," असे ते म्हणाले. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी गेल्या सहा महिने ते वर्षभरापासून राज्याच्या हिताच्या प्रकल्पांमध्ये ते 'आंदोलनजीवी' भूमिका घेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे कधीही हित पाहिलेले नसून ते केवळ ढोंग करत असल्याचा आरोप कोठे यांनी केला.

सोलापुरातील 'बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना' या म्हणीचा दाखला देत आमदार कोठे यांनी पवारांना लक्ष्य केले. बाहेरील जिल्ह्यातील असलेल्या रोहित पवारांनी सोलापूरच्या विकासात आणि पाण्याच्या प्रश्नात हस्तक्षेप करू नये, असा इशारा त्यांनी दिला. धरणाच्या केवळ ९ टक्के भागात सोलर बसवले जाणार असल्याने मासेमारीचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे स्पष्ट करत देशातील इतर यशस्वी प्रकल्पांचा संदर्भही त्यांनी दिला.

रोहित पवार स्वतःची महत्त्वाकांक्षा आणि मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याची संधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करून स्टंट करत असल्याचे कोठे म्हणाले. पवारांकडून या प्रकल्पाविषयी खोटा नरेटिव्ह पसरवला जात आहे. प्रत्यक्षात या एआय डेटा सेंटरच्या माध्यमातून ४० ते ४२ हजार जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार असल्याचा दावा आमदार कोठे यांनी यावेळी केला.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या