मुंबई, 30 ऑक्टोबर: सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुम्हाला सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का? डोकं जड पडणे, सुस्ती येणे किंवा कंटाळा वाटत असेल तर याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चांगली झोप हा उत्तम दिवसाचा पाया असतो, परंतु सकाळी उठताना ताजंतवाने न वाटण्यामागे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीतील अनेक चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात.
दीर्घकाळ एकाच जागी बसून राहण्याची सवय, स्क्रीनचा अतिवापर आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात थकवा व चिडचिड वाढते. याव्यतिरिक्त तणाव घालवण्यासाठी मद्यपान किंवा धूम्रपानाचा आधार घेणेही हानिकारक ठरते. झोपण्याच्या वेळा अनियमित असणे, आजूबाजूला गोंगाट असणे, तसेच झोपण्यापूर्वी कॅफीनचे सेवन करणे किंवा अगदी झोपेच्या आधी व्यायाम करणे यामुळे झोपेच्या गुणवत्तेत अडथळा निर्माण होतो आणि शरीराला योग्य विश्रांती मिळत नाही.
या समस्येमागे शरीरातील पाण्याची कमतरता हेही एक कारण असू शकते. रात्रीच्या वेळी घाम येणे, आजारपण किंवा वारंवार लघवीला जावे लागल्यास शरीरातील पाण्याची पातळी वेगाने खाली येऊ शकते. लघवीचा रंग स्वच्छ किंवा फिकट पिवळा असणे हे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे लक्षण आहे. आहाराच्या बाबतीत केवळ आवडीचेच पदार्थ खाल्ल्याने शरीराला संतुलित पोषण मिळत नाही. व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो, ज्यामुळे दिवसभर जांभया येणे आणि ऊर्जेचा अभाव जाणवतो.
शारीरिक निष्क्रियतेचा झोपेच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. व्यायामाअभावी रात्रीची झोप खालावते. त्यामुळे दररोज किमान १५० मिनिटे व्यायाम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे आणि दिनचर्येत योगासने व ध्यानाचा समावेश करावा. तणावामुळे निद्रानाश होऊ शकतो, त्यामुळे सकाळी फेरफटका मारणे, संगीत ऐकणे किंवा आपल्या छंदांसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. या उपायांनंतरही तणाव कमी न झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरते.
सतत डोकं जड होणे किंवा थकवा जाणवणे हे केवळ सवयींपुरते मर्यादित नसून, ते थायरॉईड किंवा मधुमेहासारख्या अंतःस्रावी विकारांचे लक्षण असू शकते. ॲनिमियामुळे शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याची रक्ताची क्षमता घटते, तर मूत्रपिंड निकामी झाल्यास रक्तात विषारी घटक साचून थकवा येतो. यासोबतच काही ऑटोइम्यून आजार चयापचय क्रियेवर परिणाम करतात. महिलांना रजोनिवृत्तीच्या काळातही अशक्तपणाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास संभाव्य आजारपणाचा धोका टाळता येतो.
रात्री उशिरा जेवणे, अपुरी झोप आणि पोषण व व्यायामाचा अभाव हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. या समस्या टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक तास आणि सकाळी उठल्यानंतर एक तास मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर पूर्णपणे थांबवावा. या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात जीवनशैलीशी संबंधित गंभीर आजार ओढवू शकतात.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२७: मुंबई इंडियन्सकडून रॉबिन उथप्पाची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून घोषणा
- सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची करडी नजर; तुकाराम मुंढेंचा इशारा, १९ कोटींचे मसाले जप्त
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आरोपानंतर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा




