नागपूर, 23 ऑक्टोबर: नागपूर येथे सुरू असलेल्या महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० ट्रॉफी सामन्यात एक अनपेक्षित घटना घडली. कर्नाटक आणि विदर्भ यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असताना अचानक एका माकडाने मैदानात प्रवेश केला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या कर्नाटकच्या उमा काश्वी या १५ वर्षीय खेळाडूच्या दिशेने हे माकड धावून आले. यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला होता.
ही घटना गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माकड अंगावर आल्याने उमाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. माकड जवळून निघून गेल्यानंतर ती तातडीने सावरली आणि पुन्हा उभी राहिली.
या धक्कादायक घटनेनंतरही उमाने मैदानावर आपली एकाग्रता ढळू दिली नाही. तिने अचूक गोलंदाजी करत ४ षटकांत केवळ १८ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी टिपले. तिच्या या चमकदार कामगिरीच्या जोरावर कर्नाटकने विदर्भावर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने २० षटकांत ७ गडी गमावून १४० धावा उभारल्या. यात खुशी सूर्यकांतने नाबाद ३३ तर कर्णिका कार्तिकने २३ धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या संघाला २० षटकांत ७ बाद १३४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
कर्नाटकचा पुढील उपांत्य फेरीचा सामना २४ ऑक्टोबरला बडोद्यासोबत होणार आहे. तसेच दुसरी उपांत्य लढत दिल्ली आणि हरियाणा या संघांमध्ये रंगेल. हे सर्व सामने नागपुरातील लेडी अमृतबाई डागा कॉलेजच्या मैदानावर खेळवले जात आहेत.
दरम्यान, उमा काश्वीने आगामी महिला प्रीमियर लीग (WPL) २०२७ च्या लिलावासाठी आपली नोंदणी आधीच केली आहे. तिची मूळ किंमत १० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. देशांतर्गत स्पर्धांमधील आपल्या प्रभावी कामगिरीमुळे डब्ल्यूपीएल फ्रँचायझींचे लक्ष वेधले जाईल, अशी आशा या युवा खेळाडूला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत वि न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना मोफत कुठे पाहायचा? वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री
- वैभवला IND vs NZ दुसऱ्या टी-२० मध्ये संधीची शक्यता; तर CSK च्या आयुष म्हात्रेला दुखापतीचा मोठा धक्का
- चुलत्याचे १५ तोळे सोने चोरून पुतण्याने घेतली ‘थार’; गाडीच्या पूजेला बोलावले अन् भिंग फुटले!




