चुलत्याचे १५ तोळे सोने चोरून पुतण्याने घेतली ‘थार’; गाडीच्या पूजेला बोलावले अन् भिंग फुटले!

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे पुतण्याने चुलत्याचे १५ तोळे सोने चोरून थार गाडी खरेदी केली. पूजेला बोलावल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

mahasatta

पन्हाळा, 23 ऑक्टोबर: स्वतःची कार असावी या हौसेपोटी एका १९ वर्षीय तरुणाने सख्ख्या चुलत चुलत्याच्याच घरात डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे उघडकीस आला आहे. आरोपी पुतण्या समर पोपट चव्हाण याने चुलत्याच्या घरातील १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून त्यातून नवीकोरी महिंद्रा थार (Mahindra Thar) खरेदी केली.

या घटनेतील सर्वात चकित करणारी बाब म्हणजे, गाडी खरेदी केल्यानंतर समरने पूजेसाठी शेजारीच राहणारे चुलते उमेश मारुती चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रित केले होते. या पूजेला जाताना घालण्यासाठी उमेश चव्हाण यांच्या पत्नीने दागिन्यांचा शोध घेतला, तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ज्या ठिकाणी दागिने ठेवले होते, तिथे असलेले आजीचे दागिने मात्र सुरक्षित होते. केवळ उमेश आणि त्यांच्या पत्नीचेच दागिने चोरीला गेल्याने हा प्रकार घरातीलच व्यक्तीचा असावा, अशी शंका त्यांना आली. यानंतर उमेश चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी कोडोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. समरकडे नवीन गाडी घेण्यासाठी अचानक पैसे कुठून आले, याची चौकशी केली असता त्यानेच चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. साधारण महिन्याभरापूर्वी चोरलेले हे दागिने त्याने गावातीलच सोनार संग्राम बाबासो मोरे याला संगनमताने १० लाख रुपयांना विकले होते व त्यातून थार घेतल्याची कबुली त्याने दिली.

याप्रकरणी कोडोली पोलिसांनी आरोपी समर चव्हाण आणि चोरीचे दागिने विकत घेणारा सोनार संग्राम मोरे या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पर्यवेक्षणाधीन पोलीस उपाधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या