प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात वैभवला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता असतानाच, दुसरीकडे स्टार सलामीवीर आयुष म्हात्रेला मात्र मोठा धक्का बसला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार असलेल्या आयुषला उजव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले असून, तो आता दीर्घ काळासाठी मैदानाबाहेर गेला आहे.
काही दिवसांत सर्व फ्रँचायझी आपले कायम ठेवलेले आणि मुक्त केलेले खेळाडू बोर्डाकडे सादर करणार आहेत. आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे. मुंबईत ११ ऑक्टोबर रोजी चंदीगडविरुद्ध झालेल्या हंगामातील पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान ही घटना घडली. विकेट्सदरम्यान धावताना आयुषच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला ग्रेड ४ ची दुखापत झाली होती. यामुळे आगामी आयपीएल २०२७ मध्ये त्याचे खेळणे मुश्किल झाले आहे.
या दुखापतीवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “आयुष म्हात्रेच्या उजव्या हॅमस्ट्रिंगवर गुरुवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी केली.”
याबाबत अधिक माहिती देताना सूत्राने स्पष्ट केले, “त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, त्याला पूर्णपणे बरे होऊन स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी अंदाजे २-३ महिने लागू शकतात. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि शुक्रवार सकाळपर्यंत आयुष कुबड्यांच्या साहाय्याने हळूहळू चालत होता.”
आयुषला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल सामन्यात त्याला डाव्या हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यावेळी बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याने सलग तीन महिने उपचार आणि पुनर्वसन घेतले. मात्र, त्या दुखापतीतून सावरल्यानंतर पहिल्याच सामन्यात तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला.
आयुषच्या अनुपस्थितीमुळे यंदाच्या रणजी हंगामात मुंबईच्या संघाला नवीन सलामीची जोडी शोधावी लागली आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात त्याने यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात केली होती. पण यशस्वी भारतीय संघात परतल्यानंतर, हिमाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत मुंबईकडून अंगक्रिश रघुवंशी आणि दिव्यांश सक्सेना या नव्या जोडीने डावाची सुरुवात केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- चुलत्याचे १५ तोळे सोने चोरून पुतण्याने घेतली ‘थार’; गाडीच्या पूजेला बोलावले अन् भिंग फुटले!
- विषारी साप खाऊनही मुंगूस जिवंत कसा राहतो? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण
- आयफाच्या मंचावर सलमान खान शाहिद कपूरबद्दल असं का म्हणाला? नेटकऱ्यांमध्ये बिष्णोई गँगची चर्चा




