प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'चे दोन हप्ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. ऐन संकटाच्या काळात राज्यातील जवळपास ९२ लाख पात्र शेतकरी या चार हजार रुपयांच्या मदतीची वाट पाहत आहेत. मात्र, या हप्त्यांबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सध्या राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी लोकांचे शहरांकडे स्थलांतर होत असल्याने काही गावे ओस पडू लागली आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत ही परिस्थिती आणखी विदारक होण्याची भीती आहे. रब्बी हंगामही हातचा जाण्याची शक्यता असल्याने शेतीचे उत्पन्न घटले आहे. अशा विवंचनेत कुटुंबाचा आणि जनावरांचा गाडा कसा हाकायचा, या चिंतेत असलेला बळीराजा आता सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे.
राज्य सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये 'पीएम किसान सन्मान निधी'च्या धर्तीवर ही योजना सुरू केली होती. याअंतर्गत केंद्राप्रमाणेच दरवर्षी तीन टप्प्यांत ६,००० रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. सध्या नमो शेतकरी योजनेचा नववा आणि दहावा हप्ता प्रलंबित असून, यासाठी ३,७०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मार्च आणि जुलै महिन्यात या निधीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता, परंतु त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, सरकारच्या निकषानुसार यात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पीएम किसान योजनेचे हप्ते नियमितपणे जमा होत आहेत. या महिन्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा २४ वा हप्ता म्हणून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, मोठा आर्थिक दिलासा मिळण्यासाठी नमो योजनेचे प्रलंबित ४ हजार रुपयेही तातडीने जमा करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कट; ५०० कोटींच्या क्लिपवरून अब्दुल सत्तारांचा खळबळजनक दावा
- अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बची धमकी; दादरमधील शाळा, महापौर कार्यालयही लक्ष्यावर
- SBI बँकेवर सायबर हल्ला; डार्क वेबवर ग्राहकांचा डेटा लीक, ‘सर्ट-इन’कडून तपास सुरू




