प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: बीसीसीआयच्या मुख्य निवड समिती अध्यक्षपदाची शर्यत आता रंजक वळणावर पोहोचली आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्यानंतर, आता या पदासाठी भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबईकर खेळाडू वसीम जाफर यांनी अर्ज केला आहे. खुद्द जाफर यांनी 'पीटीआय'शी बोलताना अर्ज केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विद्यमान निवड प्रक्रियेच्या नियमांनुसार, ज्या झोनच्या सदस्याकडे सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असतो, तो अध्यक्षपदासाठी पात्र ठरतो. सध्या ४८ वर्षीय असणाऱ्या जाफर यांच्या नावावर ३१ कसोटी सामन्यांचा अनुभव असून त्यांनी यात १९४४ धावा केल्या आहेत. तसेच त्यांच्या नावावर पाच कसोटी शतकांची नोंद आहे. यात वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध (कोलकाता येथे) झळकावलेल्या द्विशतकांचा, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका शतकाचा समावेश आहे.
कसोटी सामन्यांच्या अनुभवाच्या निकषावर जाफर यांची दावेदारी अत्यंत मजबूत मानली जात आहे. त्यांच्या तुलनेत भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने २४ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, केवळ कसोटी सामन्यांच्या संख्येच्या आधारावर अध्यक्षपदाची नियुक्ती निश्चित मानली जाणार नाही. यासंबंधीचा अंतिम निर्णय क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) आणि बीसीसीआयच्या प्रक्रियेनुसारच होईल. या समितीत अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश असून ते अर्जदारांच्या अनुभवाचा अभ्यास करणार आहेत.
एकिकडे वसीम जाफर आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या जोरावर अधिक योग्य उमेदवार वाटत असले, तरी बीसीसीआयमध्ये प्रज्ञान ओझा यांना भक्कम पाठिंबा असल्याचे समजते. अनेकांचे ओझा यांनाच अध्यक्ष बनवण्याबाबत ठोस मत आहे. जर ओझा यांना या पदावर प्राधान्य मिळाले, तर निवड समितीचे स्वरूप वेगळे असेल. अशा परिस्थितीत भारतासाठी दोन कसोटी सामने खेळलेले माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार हे देखील पश्चिम झोनमधून संभाव्य उमेदवार म्हणून निवड समितीत स्थान मिळवण्याचे दावेदार असू शकतील.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप, त्याआधीच टीम इंडियाच्या निवडीत गोंधळ; अश्विन म्हणाला, ‘हा तर अन्याय’
- मंधाना पर्वाची विजयी सुरुवात: पदार्पणात निकी प्रसादची चमक, झिम्बाब्वेवर ४ विकेट्सने विजय
- ३० व्या वर्षी धुरंधर वेगवान गोलंदाजाची निवृत्ती; चार वर्ल्ड कपचा अनुभव, कारण वाचून बसेल धक्का




