प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: आगामी २०२६ च्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदिवसीय आणि कसोटी संघांची अधिकृत घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय आणि एक कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंच्या कामाचा ताण व्यवस्थापन लक्षात घेऊन बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी दोन स्वतंत्र संघांची निवड केली आहे.
पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व शुभमन गिल करणार असून श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर, शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांची धुरा श्रेयस अय्यर सांभाळेल आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनकडे उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ही नवी जबाबदारी इशानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.
या संघ निवडीतील सर्वांत आश्चर्यकारक निर्णय म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना वगळण्यात आले आहे. अजित आगरकर हे मुख्य निवडकर्ता पदावरून पायउतार झाल्यानंतर हे दोन्ही खेळाडू संघात पुनरागमन करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांतून पुन्हा डावलण्यात आले आहे.
निवड समितीने अनुभवी गोलंदाजांऐवजी युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांच्यासह अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराहला केवळ कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
एकदिवसीय संघात नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, आकिब नबी, यश ठाकूर आणि कुमार कुशाग्र यांसारख्या युवा प्रतिभांनाही संधी मिळाली आहे. तर कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपद आणि केएल राहुलकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कसोटी संघात यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव.
शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक / उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.
📌 महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीची ‘लिंक्डइन’वर पहिली पोस्ट; निवृत्तीनंतर ९ ते ५ ची नोकरी करणार? चाहत्यांमध्ये चर्चा
- भारत कमावणार २८४ कोटी, वेस्ट इंडिजला शून्य! ‘आयसीसी’च्या महसूल वाटपावर कॅरेबियन बोर्डाच्या CEO ची सडकून टीका
- IND vs WI: बंगळूरुतील पाचव्या निर्णायक टी२० सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द होणार?




