प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी२० सामना १७ ऑक्टोबर रोजी बंगळूरुमध्ये खेळला जाणार आहे. हैदराबादमध्ये झालेल्या चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने २४ धावांनी विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. मात्र, या अत्यंत रोमांचक ठरू शकणाऱ्या सामन्यावर पावसाचे मोठे सावट असून, खराब हवामानामुळे हा अंतिम सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अॅक्युवेदरने दिलेल्या हवामान अहवालानुसार, सामन्याच्या दिवशी बंगळूरुसाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. संध्याकाळी ५ वाजता पावसाची शक्यता ६६ टक्के असून, नाणेफेकीच्या वेळेस ती ६८ टक्क्यांवर पोहोचेल. सामना सुरू झाल्यानंतर पावसाचा धोका आणखी वाढणार असून, रात्री ८ ते ९ या वेळेत पावसाची शक्यता तब्बल ७० टक्क्यांपर्यंत असणार आहे. या सततच्या पावसाच्या इशाऱ्यामुळे नाणेफेकीला उशीर होणे, षटकांची संख्या कमी करणे किंवा संपूर्ण सामनाच रद्द होण्याचे संकट उभे राहिले आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जगातील सर्वोत्तम मानली जाणारी 'सब-एअर ड्रेनेज सिस्टीम' उपलब्ध आहे. या सुविधेमुळे पाऊस थांबल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच मैदान पुन्हा एकदा खेळण्यायोग्य होऊ शकते.
भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्यांदाच टी२० सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर एकूण ८ टी२० सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यांत विजय, तर ३ सामन्यांत पराभव पत्करला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने या मैदानावर आतापर्यंत केवळ एकच टी२० सामना खेळला असून त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.
या टी२० मालिकेतील प्रवासावर नजर टाकल्यास, लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवरील पहिला सामना भारताने ८ गडी राखून जिंकला होता. त्यानंतर रांची येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने २५० धावांचे मोठे लक्ष्य गाठत मालिका बरोबरीत आणली. तिसऱ्या लढतीत इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताने १४ धावांनी बाजी मारली. मात्र, हैदराबादमधील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा २४ धावांनी पराभव केल्याने मालिका सध्या २-२ अशा बरोबरीच्या टप्प्यावर आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- वैभव सूर्यवंशीचा दिल्ली विमानतळावर संताप; ‘रिल्सच्या नादात…’ म्हणत पापाराझींना सुनावले
- यशस्वी जयस्वालची क्रिकेटच्या मैदानाबाहेर नवी इनिंग; स्वतःचा कपड्यांचा ब्रँड करत व्यवसायात टाकले पाऊल
- २०२१ पासून संघात संधी नाही; अखेर मराठमोळ्या पूनम राऊतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती




